विदग्ध

विदग्ध म्हणजे विद्वान. खरं तर विद्वत्तेचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे असं काही नाही. पण,या लेखनावलीसाठी काही नाव तर हवेच. बहुप्रयासानंतर विदग्ध हे नाव सुचले आणि आवडले. तसेही मी विदग्ध नसलो तरी वाचक विदग्ध आहेतच. त्यामुळे माझे मोडकेतोडके शब्दबंबाळ लेख ते रुचीपालट या न्यायाने नक्कीच वाचतील. असो. या शब्दावरुन प्राप्त सामाजिक परिस्थितीस अनुरुप ओळी मनात येतात.

तेजाळले द्वंद्व विदग्धांचे

सीमेत बद्ध असीमतेचे

भंगले तृण जाहले

शर प्रतिच्येच्या प्रत्यंचेचे

प्रत्यंचा म्हणजे धनुष्याची दोरी. प्रतिच्य अर्थात पश्चिम दिशा. पाश्चिमात्य संस्कृतीच्या (वा विकृतीच्या ) आक्रमणाने मराठी भाषा येत्या ५० वर्षांनी शिल्लक तरी राहील काय असा जो एक संभ्रम निर्माण झाला आहे त्यांस आमुचे हे विनम्र उत्तर आहे.

ता.क. ही लेखनावली आधी एका वेगळ्या दुव्यावर उपलब्ध होती, ती आता येथे स्थानांतरीत झालेली आहे. तसदिबद्दल क्षमस्व्!