साहित्य आणि गणित – २

प्रथम लेखात विशद केल्याप्रमाणे साहित्य आणि गणित यांचा परस्परसंबंध निश्चितच आहे. त्याचे दर्शन मला कित्येकदा अलकनंदेसारखा (गंगा) येणारा गणिताचा वेगवान प्रवाह आणि खळाळणारा साहित्याचा यमुनेचा प्रवाह यांच्या संगमासारखे भासते. त्यांच्या या संगमावर ज्ञानाच्या सरस्वतीचे दर्शन होईल आणि लेखांची एक मालिकाच तयार होईल. जेव्हा स्फूर्ती होईल तेव्हा येथे त्या माळेत एक-एक मणी जोडेलच.

आज भाषेचा विचार करू या. मराठीचे व्याकरण हे गणितासारखे नियमांत बसवलेले आहे. वाक्याची रचना ही कर्ता-कर्म-क्रियापद अशी आहे. जसे, ‘आल्हाद नदी पाहतो’ यांत ‘आल्हाद’ हा कर्ता, ‘नदी’ हे कर्म आणि ‘पाहतो’ हे क्रियापद आहे. आल्हादच्या ऐवजी कौमुदी नदी पाहत असेल तर लगेच वाक्य बदलते, ‘कौमुदी नदी पाहते.’ उदाहरणांच्या अधिक रूपात न शिरताही यांत जाणवणारी गोष्ट म्हणजे कर्ता, कर्म यांच्या लिंगाप्रमाणेच तसेच वाक्य कोणत्या काळात आहे यानुसार क्रियापदाचे रूप बदलते. एकवचन आणि अनेकवचन यांच्यासह विभक्तीचा विचार करतांना मराठीचे व्याकरण किती सुरेख आहे हे सतत जाणवते.

संधी, विग्रह आणि समासाचे नियम मायमराठीच्या सौंदर्याचा एक पदर आहे. अर्थवाही शब्द बनवण्यासाठी भाषेत ही सुविधा असणे आवश्यक आहे. एक उदाहरण घेऊ या. इंग्रजीत Data हा शब्द आहे. त्याची विविध रूपे Database, Data Structure, Data Warehouse असी होतात. यासाठी मराठीत प्रतिशब्द सुचवायचे होते. आता Data हा शब्द Datum चे अनेकवचन आहे. Datum हा लॅटिन शब्द, देणे या अर्थाच्या क्रियापदापासुन उत्पन्न झाला आहे. यासाठी विचार करतांना विद् या शब्दाचे रूप प्रगटले. विद् म्हणजे जाणणे, त्यापुन विदा हा Data साठी प्रतिशब्द वापरण्यास सोपा आणि अर्थवाही वाटल्याने तो निश्चित केला. खरी मौज Data च्या विविध रूपांना प्रतिशब्द सुचवतांना आली.

त्यांची रूपे पाहता -
Database म्हणजे विदाचे जलाशय अर्थात विदा+आशय = विदाशय,
Data Structure अर्थात विदा+आकृती = विदाकृती,
Data Warehouse अर्थात विदा+आगार = विदागार, आणि
Datum अर्थात विदा+अंश = विदांश.

संधी-विग्रहांच्या नियमांशिवाय हे प्रतिशब्द खूप बोजड झाले असते. पण, ह्या नियमांमुळे त्यांना एक प्रकारे माधुर्य प्राप्त झाले. तसेच, इंग्रजीत येणारी अडचण म्हणजे एका संज्ञेसाठी दोन शब्दांचा पुंजका करण्याची आवश्यकता राहीली नाही. एका संज्ञेसाठी एकच शब्द देता आला. शब्दांच्या बाबतीत इंग्रजीत बराचसा सुटेपणा आहे. तर, एकसंधता हा मराठी भाषेतच आहे. भाषा हे अभिव्यक्तीचे साधन तर आहेच. याशिवाय, आपल्या विचारांच्या रूपांवर येणा-या मर्यादा ह्यासुद्धा भाषेमुळेच ठरतात. अर्थातच मराठीच्या व्याकरणातील रचनेच्या एकसंधतेचा फायदा हा मराठीत विचार करणा-याला होतो. खरं म्हणजे मागिल दोन वाक्ये ही स्वतंत्र पुस्तकाचा विषय होतील. पण, आपला प्रस्तुत विषय साहित्य आणि गणिताच्या संबंधाविषय असल्याने गाडी मुळ विषयाकडे आणू या.

व्याकरणाचे विविध पदर उलगडतांना आपल्याला त्यातील गणित हे पदोपदी जाणवते. आपली मातृभाषा ही आईप्रमाणेच प्रिय असतेच. पण, तिचे दिव्यत्व नविन शब्द निर्माण करतांना अशा रितीने आकस्मिक जाणवल्याने मला जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करणे माझ्या अवाक्याबाहेरचे आहे.

मायमराठी तूजसी साष्टांग दंडवत!

क्रमशः

(शैलेश श. खांडेकर)

7 प्रतिसाद to this post.

  1. शैलेश,

    शब्दभांडारात विदा हा शब्द तुम्ही सहा महिन्यांपूर्वी सुचवल्यापासून आजवर तो अनेक ठिकाणी वापरला गेलाय. परंतु जोवर असे शब्द वर्तमानपत्रांतून लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, तोवर ते खऱ्या अर्थाने रुळणार नाहीत. यासाठी काय करावे ?

    - मिलिन्द

  2. आपण मी काढलेली चित्रे दर्शनीय आहेत असे म्हटले आहे.
    माझ्या चित्रांचा दर्जा(!) थोडा वेळ बाजूला ठेवून एक शंका मनात आली ती विचारतो
    दर्शनीय की प्रेक्षणीय कोणता शब्द योग्य??
    दर्शनीय आणि प्रेक्षणीय मध्ये फरक काय?
    दर्शनीय = दाखवण्यायोग्य
    प्रेक्षणीय = पाहण्यायोग्य हा ढोबळ फरक मानावा काय?

  3. सुंदर विवेचन!

  4. Sundar khup diwasni marathi wachtana bare watale
    Dynaneshwari baddal aapn kahi tari lihave hi vinanti

  5. [...] खांडेकर ह्यांची ‘विदग्ध’ ही [...]

  6. मिलिंद भांडारकर,
    नवीन शब्द मराठीत आणणे आणि ते रूजवणे ह्यांसाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. जे शब्द बहुतांश लोकांना आवडतील तेच शब्द रूळतील. वृत्तपत्रांतून तंत्रज्ञानविषयक लेख लिहून त्यात या शब्दांचा वापर करणे हा एक चांगला मार्ग प्राप्त परिस्थितीत दिसतो.

    योगेश,
    आपण काढलेली चित्रे दर्शनीय म्हणजे सगळ्यांना आवर्जून दाखवण्याजोगी आहेत हेच मला म्हणायचे होते, :)

    विशाल, अविनाश, वातकुक्कुट,
    आपले मनःपूर्वक आभार! ज्ञानेश्वरीवर लिहिण्यासाठी ज्ञानोबा माऊली स्फूर्ती देईलच तेव्हा अवश्य लिहिल.

Comments are closed.