प्रताधिकाराचे कवित्व :)

विश्वजाळावर मायमराठीचा सूर्य कधीच प्रकाशला आहे. उषःकाल कितीही सुखावह असला तरी तळपत्या सूर्याचे दर्शन हीच तर वृक्षवेलींच्या अंतरीची उत्कट इच्छा असते. त्यानेच त्यांची वाढ होते. त्याचप्रमाणे मराठीचे विश्वजाळावरील अस्तित्व माध्यान्हीच्या सूर्याप्रमाणे तळपावे असे मला सदैव वाटते. आपणही याच्याशी सहमत असालच. त्या दृष्टीने मराठीत नवनवीन अनुदिनींची (ब्लॉगांची) तसेच संस्थळांची (वेबसाईटांची) भर पडणे इष्ट आहे. सध्याची परिस्थिती पोषक असली तरी त्यात सुधारणेस बराच वाव आहे.

नियमित, ऊस्फुर्त लेखन हे चांगल्या अनुदिनीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. यात नियमितपणा हा भाग साधा वाटत असला तरी ऊस्फुर्तपणापेक्षा साधायला अधिक अवघड आहे. तसेही दैनंदिन जीवनात साध्या गोष्टी साधणे हे किचकट गोष्टी साधण्यापेक्षा अधिक अवघड असते, होय ना? उदाहरणार्थ, आज्ञावली लिहीणे हे नियमितपणे पहाटे सहा वाजता उठण्यापेक्षा अधिक किचकट काम आहे. तरीही आज्ञावली लिहिणे हे सहज साधते पण रोज पहाटे सहा वाजता उठणे – हर, हर! त्यापेक्षा राजकीय नेत्याच्या भाषणाचे रसग्रहण जास्त सोपे आहे हा सार्वत्रिक अनुभव असावा. सारांश, नियमित आणि ऊस्फुर्त लेखन हे तुलनेने अवघड काम आहे. अतिशय तीव्र इच्छाशक्ती आणि अंमळ प्रमाणात नियतीची प्रेमळ दृष्टी त्यासाठी आवश्यक ठरते. बरेच लोक मराठीच्या प्रेमाखातर अनुदिनी लेखन सुरू तर करतात. मात्र, नंतर या कामातील अवघड भाग लक्षात आल्यावर कालांतराने उत्साह ओसरतो.

काही लोकांनी यावर एक नामी उपाय शोधून काढला आहे. ते इतर अनुदिनीवरील संपूर्ण रचनाच मूळ लेखकाच्या (किंवा लेखिकेच्या) परवानगीशिवाय छापतात. शिवाय, त्यांच्या संस्थळावर गुगल वा अन्य स्थळांच्या सौजन्याने जाहीरातीही असतात. थोडक्यात आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते असा प्रकार होऊ शकतो. सुदैवाने विदग्धच्या बाबतीत असे झाले नाही. आजवर ज्या सद्गृहस्थांनी विदग्धवरील संपूर्ण लेख आपल्या अनुदिनीवर किंवा संस्थळावर छापले त्यांनी मूळ लेखाचा संपूर्ण दुवा आणि मला उचित श्रेयही दिले आहे. भलेही त्यांनी माझी परवानगी घेतली नसेल. पण, त्यांच्या श्रेयनामावलीच्या माणुसकीला मी अवश्य दाद देऊ इच्छितो.

असे म्हणतात की कुलुपाचे प्रयोजन हे सज्जन माणसांकरिता असते. एखाद्या घरास कुलुप नसल्याने सज्जन माणासाची बुद्धी बिघडू नये म्हणून कुलुप लावतात इतकेच! अन्यथा, एखाद्या चोरास त्या घरातील द्रव्य हरण करायचेच असेल तर तो सरळ कुलुप तोडून आत शिरेल. हाच न्याय आपण अनुदिनींना व संस्थळांना लावू शकतो. संगणकाच्या बाबतीत एक तांत्रिक सोय म्हणजे कुठलाही लेख किंवा कवितेची चटकन प्रत काढता येते. अर्थातच, ती प्रत कुठे आणि कशी प्रकाशित करायची हे मूळ लेखकाच्या हाती नसते. एकदा का आपण लेख प्रकाशित केला की त्यावर आपले नियंत्रण राहू शकत नाही.

या सर्वांचा विचार करता विदग्धवरील रचना इतर कुणी जशीच्या तशी छापणे थांबवणे अवघड आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. तसेच, त्या रचनांसोबत जाहिराती देऊन त्यावरून कुणीतरी पैसेही कमवत असेल हेही खरेच. मला त्यांच्याबद्दल असूया नाही. माझ्या दृष्टीने विदग्ध हे दोन वर्षांपूर्वी लावलेले आंब्याचे रोपटे आहे. आज त्याचे प्रशस्त आमवृक्षात रूपांतर झाले असेल व ज्याच्या शीतल छायेचा आणि आंब्यांचा, विश्वजाळावर फिरणा-या कुण्या अनामिक पांथस्थास उपयोग होत असेल, तर याहून अधिक आनंदाची गोष्ट ती कोणती?

पण, या झाडाभोवती कुंपण टाकले नाही तर त्याचे अस्तित्व नष्ट होऊन भविष्यातील पांथस्थांवर अन्याय केल्यासारखे होईल. त्यासाठी मी एक उपाय योजत आहे. तो म्हणजे विदग्धविषयक प्रताधिकार धोरण -

“विदग्धवर प्रकाशित होणा-या कुठल्याही रचना संपूर्णपणे इतर कोणत्याही अनुदिनीवर (ब्लॉगवर) किंवा संस्थळावर (वेबसाईटवर) प्रकाशित करण्यासाठी चार साध्या अटी आहेत. पहिली अट म्हणजे, मूळ रचना जशीच्या तशी, काहीही बदल न करता प्रकाशित करणे आवश्यक आहे. दुसरी अट म्हणजे, मूळ रचनेचा विदग्धवरील दुवा देणे आवश्यक आहे. तिसरी अट म्हणजे, मूळ रचना प्रकाशित केली तरी प्रताधिकार हा विदग्धच्या लेखकाकडे म्हणजे माझ्याकडेच राहतो आणि रचना प्रकाशित करूण्याची कृती करणारी व्यक्ती त्या कृतीतच हा अधिकार अध्याहृतपणे मान्य करीत आहे. चौथी अट म्हणजे, जर प्रकाशित करणा-या स्थळावर कुठल्याही प्रकारच्या जाहीराती देण्यात येत असतील तर त्यातून होणा-या उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम इन्फोसिस फाऊंडेशनला सामाजिक कार्यासाठी देणे बंधनकारक आहे. प्रकाशित लेखांमधुन कुणास नक्की किती उत्पन्न होईल आणि त्याचे विवरण यावर व्यावहारीक दृष्टीने माझे नियंत्रण नसल्याने ही रक्कम परस्पर इन्फोसिस फाऊंडेशनला देण्याची विनंती मी करत आहे. कृपया ती रक्कम त्या स्थळांच्या चालकांच्याच नावाने देण्यात यावी. चिमूटभर मीठाप्रमाणे (योग्य श्रेय देऊन) रचनेतील अंश उद्धृत करतांना हे धोरण लागू होत नाही आणि त्यासाठी माझी पूर्वपरवानगी घेतली नाही तरी चालेल. विदग्धचे प्रताधिकार धोरण येथे संपते.”

तसे पाहता चारही अटी साध्या आणि सोप्या आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनलाच ती रक्कम का द्यायची याची कारणेही साधीच आहेत -
१. माझा इन्फोसिस फाऊंडेशनशी कसलाही वैयक्तिक संबंध नाही. त्यांचे कार्य पाहून मी प्रभावित झालो आहे. त्यांच्या निःपक्षपातीपणाबद्दल मला आदर आहे.
२. सूधा मूर्तींच्या विशाल अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा इन्फोसिस फाऊंडेशनला सुयोग्य लाभ होतो. त्यांचे काम अतिशय पारदर्शी आणि परिणामकारक असते. सामाजिक कार्यातून येणारा निधी योग्य कारणासाठीच वापरल्या जात आहे याकडे त्यांचे काटेकोर लक्ष असते.
३. मी नुकतेच “पुण्यभूमी भारत” हे पुस्तक वाचले. त्या पुस्तकातून मानधनापोटी येणारे सर्व उत्पन्न सुधाताई सामाजिक कार्यासाठीच खर्च करतात. ही गोष्ट प्रेरणा घेण्याजोगीच आहे.
४. इतर सामाजिक संस्थांची गुणवत्ता कमी-अधिक असू शकेल. परंतू, मला सगळ्याच संस्थांविषयी माहिती नाही. तसेच, वारंवार विदग्धचे प्रताधिकार धोरण बदलणे हेही फारसे हितावह नाही.
५. देण्यात येणारी रक्कम ही संस्थळांच्या चालकांच्या नावेच देण्यात यावे अशी विनंती मी केली आहे. त्याने त्यांना आयकरात सुटही मिळू शकेल आणि हे चांगले काम करतांना फारशी डोकेदुखीही होणार नाही.

वाचकांना अर्थातच यात कुठलाही त्रास नाही. अशा प्रकारे हे प्रताधिकाराचे कवित्व समाप्त झाले. समारोप करतांना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाचा आश्रय घेतो -

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परे जडो । मैत्र जीवांचे ।।
दुरीतांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछिल, तो ते लाहो । प्राणिजात ।।

(शैलेश श. खांडेकर)

9 प्रतिसाद to this post.

  1. तुम्ही एका महत्वाच्या विषयाला हात घातला आहात. मुळ लेखकाला श्रेयही नं देता मजकुर छापणे चुकीचेच आहे.
    चोरलेल्या मजकुराच्या जोरावर जाहिरातीतुन पैसा कमावणार्‍यांमधी दान करण्याची मानसिकता असेल असे वाटत नाही.तरीही दान केल्यास विदग्धला कळवावे अशी सुचना कराविशी वाटते.

  2. खरं आहे शैलेश, मलाही हा अनुभव आला आहे. त्यावर मी सुध्दा माझ्या अनुदिनीवर याला वाचा फोडली होती. परंतु संबधिताला याची काहीच चाड नसल्याने मीच माझी लेखन पध्दती बदलायचा विचार केला.
    असो , एका चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन.

  3. कसं काय, माझी दुनिया,

    आपले मनःपूर्वक आभार! विश्वजाळावर लेख आणि कवितादी रचनांचे चौर्य आपण थांबवू शकत नसलो तरी सुसंस्कृत लोकांना त्यांचा सुयोग्य वापर करण्याची संधी निश्चित देऊ शकतो. तेवढाच प्रयत्न मी केला आहे. याबाबत सर्वप्रथम मला एका निकटवर्तीय मित्राकडून कळले. त्यावर विचार करतांना हा मार्ग सुचला आणि प्रताधिकाराचे धोरण प्रकाशित केले. नुकतीच माझ्याकडे चौथ्या अटीबद्दल (इन्फोसिस फाऊंडेशनबद्दल) पृच्छा झाली. ज्यांचा इन्फोसिस फाऊंडेशनवर विश्वास नाही त्यांना कोणता मार्ग सोयीचा होईल यावर विचार करीत आहे. तुर्तास मला व्यक्तिशः पत्र पाठवून संमती मागणा-यांना त्यांचे संकेतस्थळ चाळून, पूर्वेतिहास पाहून ती अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

    मध्ये मी क्रिएटिव्ह कॉमन्सचा विचारही केला होता. परंतू, त्यात काही व्यावहारीक अडचणी वाटल्याने त्याचा वापर केला नाही. अधिक विचार करून यावर निर्णय घेईल.

  4. ब्लॉगलेखनाची चोरी ही बाब चिंताजनक होत आहे. याला कायदेशीर आळा घालण्याच्या दिशेने विचार करायला हवा. सर्व ब्लॉगलेखक मिळून “मराठी ब्लॉगविश्व”, “ब्लॉगवाणी” इत्यादि संकेतस्थळांच्या मदतीने काहीतरी करायला पाहिजे.

    असो. या विषयाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.

  5. नमस्कार,
    तुमच्या ब्लॉगला पहिल्यांदाच भेट देतीये. चांगल्या विषयाला हात घातलायत आपण. असे कित्येक जण दुस-यांच्या कविता ढापून स्वत:च्या ब्लॉअगवर टाकत असतात. कविचं नाव दिलं तर हरकत कोणाचीच नाहीये पण सरळ स्वत:च्या नावानी प्रकाशितही करतात. इथले वाचक निर्बुद्ध वाटतात कि काय या चोरांना.

    अनुमोदन तुमच्या या पोस्टला.

    धन्यवाद.
    श्यामली.

  6. प्रशांत उदय मनोहर, विशाल, श्यामली,

    आपल्या अभिप्रायांसाठी मनःपूर्वक आभार!

    शैलेश

  7. agadi yogya vichar lihila ahe tumhi.
    mi hi ek niyamit(!) vaachak ahe. tumche likhan awadle ani tyaas anumodan hi dyawese watate. hya sobat ch ha lekh majhya sangrahi thewawasa watatoy..arthat ch aaplya anumati ne!… mi majhya blog war ha lekh prakashit karu iicchchito jene karun to ankhi hi kahi lokanparyant pohochel. majha blog mhanje ashaach kahi vechak, vedhak, sangraahya kruteenwar aadhaarlela ahe.

    Kalaawe,

    Brijesh Khedkar.

  8. ब्रिजेश,

    आपले मनःपूर्वक आभार! आपण हा लेख आपल्या संग्रही अवश्य ठेवू शकता. आपल्या अनुदिनीवर (ब्लॉगवर) तो पूनःप्रकाशित केल्यास मला आनंदच होईल.

Comments are closed.