ऑपेरा न्याहाळक

विश्वजाळावर भटकंती करणारे सहसा मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर हा न्याहाळक वापरतात. हल्ली फायरफॉक्स ह्या न्याहाळकाचा चांगलाच दबदबा आहे. यांच्याच जोडीस ऑपेरा नावाचा न्याहाळकही उपलब्ध आहे. आज कुतूहल म्हणून त्याची संगणकावर स्थापना केली. तो वापरतांना जाणवणारी ठळक बाब म्हणजे तो फारच चपळ आहे. कुठलेही पृष्ठ चटकन उघडते. दुसरी नवलाईची गोष्ट म्हणजे त्याची स्थापना केल्यावर मी सवयीने गुगल उघडले. जित्याची खोड हे खरं हां! पृष्ठ उघडल्यावर चकित व्हायची पाळी आली कारण त्याने ते थेट मराठीतच उघडले. माझ्या संगणकावर विंडोज एक्सपी संविधीत मराठीचा कळफलक असल्याने त्याने आपसूकच ते उघडले असावे. मात्र हा अनुभव आजवर इंटरनेट एक्सप्लोरर किंवा फायरफॉक्समध्ये आला नाही. त्यानंतर मनोगत, उपक्रम आदी आवडीच्या स्थळांवर चक्कर टाकली. सगळ्या स्थळांवरील पृष्ठे चटकन उघडत असल्याने लगेच फायरफॉक्स आणि ऑपेरातील पृष्ठे उघडण्याच्या वेगांची तुलना केली. ऑपेरा सरस असल्याचे जाणवते. नंतर पृष्ठांच्या खूणा पाहिल्या आणि थक्कच झालो. ऑपेराने फायरफॉक्समध्ये जपलेले सगळे दुवे स्वतःच नक्कल करून ठेवले होते.

मग माझी उत्सुकता शिगेला पोहोंचली आणि त्याच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख असणारे पृष्ठ उघडले. त्यातील नोंदीविषयक दुव्यावर टिचकी मारली तर अजून एक आश्चर्य दत्त म्हणून उभे होते. या न्याहाळकात ऍडोब फ्लॅशची सोय मूळचीच आहे. त्यामुळे इंटरनेट एक्सप्लोरर किंवा फायरफॉक्स यांच्यासारखे फ्लॅशची स्थापना करण्याची यातायात करावी लागत नाही. किंवा, संगणकावर मुळचीच असलेली ऍडोब फ्लॅशची त्याने उचलली असावी. एकंदरीत हा अनुभव फारच रोचक होता.

सध्यातरी हा न्याहाळक मला आवडला आहे. काही महिने वापरल्यावर फायरफॉक्स की ऑपेरा या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकेल.

इंग्रजी दुवा – http://www.opera.com/

(शैलेश श. खांडेकर)

3 Responses to this post.

  1. शैलेश,

    ऑपेरा आहेच असा. शिवाय त्यात अनेक सोयी आहेत. त्यातला ऑपेरा ९.५० बेटा हा तर तुमच्या सगळ्या वाचनखुणा सुध्दा (बुकमार्क्स) अगदी त्यांच्याकडे जपून ठेवतो.

    ऑपेरा हा फायरफॉक्स सारखा जास्त मेमरी खात नाही. म्हणून जदल चालत असावा.

  2. धन्यवाद माझी दुनिया, :)

    ऑपेरा वापरतांना कामी येणा-या छोट्या-मोठ्या युक्त्या-प्रयुक्त्या आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल.

  3. शैलेश,

    ऑपेरा वापरताना तुम्हांला येणा-या अडचणी सोडवायला आवडतील. अर्थात माझ्यापेक्षाही अनेक विद्वान इथे ( महाजालावर) आहेत.

    असो, मी तुमच्या लेखांवर दिलेल्या प्रतिक्रीया बहुतांशी हिंग्लीश मध्ये आहेत. याचे कारण इच्छा असली तरी माझे मराठी तुमच्या इतके प्राज्ञ नाही. लिहिताना तर सारखे पर्यायी शब्द अडतात. मला माहीत आहे, ही एक निव्वळ सबब आहे. मराठी च्या प्रेमाखातर इतके करायला काही हरकत नाही. पण मग ते ओढून ताणून लिहिल्यासारखे वाटते. भाषा ओघवती वाटत नाही. म्हणून प्रतिक्रियांमध्ये प्रचलित शब्दच घेतले आहेत.

    तसदीबद्दल क्षमस्व.

Comments are closed.