विकिपिडीया हा जगातील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोष प्रकल्प आहे. त्यात आपल्या माय-मराठीचेही चांगलेच अस्तित्व आहे. विकिपिडीयामागची कल्पना उत्तम आहे आणि त्याचा विस्तारही प्रचंड झाला आहे. परंतू, त्यातल्या काही उणीवाही ठळकपणे पुढे आल्या आहेत. त्यापैकी एक भाग म्हणजे विकिपिडीयातील विविध लेखांच्या गुणवत्तांची पातळी निरनिराळी असते. व्यक्तीशः मला विकिपिडीया कितीही आवडला तरी हा भाग बराच अडचणीचा वाटतो.
या आणि अशाच प्रकारच्या उणीवा दूर करण्यासाठी लॅरी सॅग्नर या गृहस्थाने सिटिझेंडियमची स्थापना केली. त्या संस्थळाचे बाह्य रूप विकिपिडीयासारखेच दिसत असले तरी त्याची कार्यशैली पूर्ण वेगळी आहे. सिटिझेंडियमवर लेखन करतांना (विकिपिडीयासारखे) टोपणनाव घेता येत नाही. तसेच सिटिझेंडियमवर लिहिलेला प्रत्येक लेख त्या-त्या विषयांतील तज्ञ संपादकांकडून तपासल्या जातो आणि त्यांचे अनुमोदन मिळाल्यावरच तो ग्राह्य धरल्या जातो. संपादक मंडळावर विविध विद्यापीठांचे प्राध्यापक आणि नामवंत तज्ञांचा समावेश आहे. उदाहरणार्थ संमिश्र संख्यांविषयीच्या लेखास अनुमती देणा-या संपादकापैकी ग्रेग मार्टिन हे कॅनाडातील व्हँकोव्हर विद्यापीठात गणिताचे सहयोगी प्राध्यापक आहेत तर जित्से नायजेन हे इंग्लंडच्या लीडस् विद्यापीठात गणिताच्या विभागात रॉबर्टस् फेलोशिप घेऊन संशोधन करत आहेत.
नुकत्याच चर्चेत आलेल्या गुगल नॉलबद्दल आपल्याला गुगलच्या अनुदिनीमुळे ठाऊक असेलच. गुगल नॉल आणि सिटिझेंडियम यांच्यातील फरक सिटिझेंडियमच्या अनुदिनीवर छान विषद केला आहे. सांप्रत सिटिझेंडियमवरील लेखांची संख्या विकिपिडीयाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. परंतू, त्यांची गुणवत्ताविषयक पराकोटीचा आग्रह हे योग्य दिशेने पडलेले पाऊल आहे असे वाटते. तूर्तास आपण विकिपिडिया आणि सिटिझेंडियम या दोन्ही संस्थळाचा वापर करावा हेच उत्तम! मात्र, आवर्जून दखल घेण्याजोग्या संस्थळांमध्ये सिटिझेंडियमचा समावेश होतो हे नक्की!
सिटिझेंडियमबद्दल आपले काय मत आहे? तसेच, विदग्धच्या वाचकांपैकी कुणी मराठीचे प्राध्यापक असल्यास त्यांना सिटिझेंडियमवर मराठी विभाग सुरू करण्याची विनंती करावी काय?
दुवे -
सिटिझेंडियमचे मुखपृष्ठ – http://en.citizendium.org/wiki/Main_Page
गुगल नॉलचा दुवा – http://googleblog.blogspot.com/2007/12/encouraging-people-to-contribute.html
सिटिझेंडियम आणि विकिपिडायतील भेदाभेद – http://en.citizendium.org/wiki/CZ:We_aren%27t_Wikipedia
सिटिझेंडिय आणि गुगल नॉल - http://blog.citizendium.org/2007/12/15/how-does-the-citizendium-differ-from-the-knol-proposal/
(शैलेश श. खांडेकर)

Posted by kasakaay on डिसेंबर 20, 2007 at 5:26 AM
सिटिझेंडियमचे स्वागत.
या विषयावर “Nation of fools” नावाचा एक लेख वाचला होता. त्यालेखातही User Generated Content मुळे निकृष्ट दर्जाची, चुकीची माहिती इंटरनेटवर सतत प्रसिद्ध होत असल्याचे दाखले दिले होते.
एकेकाळी छापलेला शब्दनशब्द खरा मानणारा एक वर्ग होता, तसा आता इंटरनेटवर प्रसिद्ध झालेले सर्व खरे मानणारा वर्ग तयार झाला आहे.
माहितीचा विस्फोट झाल्याचे तोटेच खूप आहेत. मोजकीच पण अभ्यासपूर्ण माहिती हाती लागल्यास कितीतरी वेळ व गैरसमज वाचतील.
सिटिझेंडियमवर मराठी सुरू करण्याची विनंती जरूर करावी, पण मराठीचे प्राध्यापक फार तर साहित्यावर भाष्य करू शकतील. इतर विषयांचे काय?
Posted by ashintosh on डिसेंबर 21, 2007 at 5:07 AM
विकीपिडियाचे मूळही अशीच संकल्पना होती न्यूपीडिया नावाचे. न्यूपीडियावर तज्ज्ञांचेच लेख, पिअर रिव्हू वगैरे ही प्रकार होते.
पुढे ती मागे पडली व विकी ची संकल्पना पुढे आली व विकसित झाली. अधिक माहिती विकीवर. अधिक माहिती अर्थातच विकीवर
Posted by Shailesh S. Khandekar on डिसेंबर 23, 2007 at 4:38 AM
कसं काय, अशिंतोष,
आपल्या अभिप्रायांसाठी मनःपूर्वक आभार!
आत्ताच सिटिझेंडियमवर भाष्य करणारा एक दुसरा लेख वाचला. त्या अनुदिनीकाराने एक मनोरंजक निरिक्षण नोंदवले आहे. ते अशिंतोष यांच्या अभिप्रायास अनुरूप असे आहे.
दुवा – http://weblog.terrellrussell.com/2007/12/wikipedia-is-good-enough-good-grief/
न्यूपीडीयाबद्दल वाचून नवल वाटले. तसेच, कसं काय यांनी मराठीसंबंधी साहित्याशिवाय इतरही विषयांबद्दल उपस्थित केलेला मुद्दा योग्यच आहे.