विश्वजाळावर अनुदिनींचा सागर पसरला आहे. अगदी निवडून घ्यायच्या म्हटल्या तरी चांगल्या अनुदिनींची संख्या शेकड्यांच्या घरात सहज जाते. त्यातच एखाद्या वाचकाला नानाविध विषयांची गोडी असली तर विचारूच नका. अक्षरशः रोज हजारो लेखांच्या रांगोळ्या बनतात. दररोज एका नवीन गलेलठ्ठ पुस्तकाचे वाचन करण्यासारखाच हा प्रकार आहे. या कामी वाहिनीवाचकाचा (फिड रिडरचा) प्रचंड उपयोग होतो. त्यातील मला सर्वोत्कृष्ट वाटणारा वाहिनीवाचक म्हणजे गुगल रिडर हा आहे.
गुगल रिडरमध्ये आपल्याला आवडलेल्या लेखांचा संग्रह करण्याची सोय आहे. तसेच हे लेख इतरांना उपयुक्त होऊ शकतील असे आपल्याला वाटले तर आपण त्या लेखांना खूण करून ठेऊ शकतो. अशा सगळ्या खूणा केलेल्या लेखांची गुगल रिडर एक स्वतंत्र वाहिनी आपसूकच प्रकाशित करते. उदाहरणार्थ मी खूणा केलेल्या इंग्रजी लेखांची वाहिनी येथे आहे -
http://www.google.com/reader/shared/06583955421310467659
नुकतीच गुगल रिडरमध्ये एक नवीन सोय उपलब्ध झाली. गुगल मेल किंवा गुगल टॉकमध्ये असलेल्या आपापल्या मित्र-मैत्रीणी जर गुगल रिडर वापरत असतील तर त्यांनी खूणा केलेले लेख आपोआप तुमच्या वाचनयादीत येतात. चांगल्या सोबतीचा फायदा होतो तो असा,
गुगल रिडरची आज्ञावली विकसित करणा-या चमूमध्ये कुणी मराठी वाचक असतील तर त्यांना एकच (विनंतीसम) सूचना करावीशी वाटते – सर्वप्रथम या सोयीसाठी मनःपूर्वक आभार! मी खूणा करून ठेवलेले लेख गुगल रिडर वापरणा-या माझ्या सर्व मित्र-मैत्रींणींच्या वाचनयादीत जातात ही उत्कृष्ट गोष्ट आहे. मात्र त्यापैकी सर्वांनाच मराठी किंवा हिंदी येत असेल असे नाही. तसेच माझे आवडत्या इंग्रजी लेखांच्या यादीऐवजी केवळ मराठी लेखांच्या यादीतच त्यापैकी काहींना रस असेल. सध्या खूणा केलेल्या सगळ्याच लेखांची भेसळ होते. त्यामुळे कृपया भाषानिहाय स्वतंत्र वाहिन्या प्रकाशित होण्याची सोय असावी.
दुवा – http://googlereader.blogspot.com/2007/12/reader-and-talk-are-friends.html
(शैलेश श. खांडेकर)
Posted by ashintosh on डिसेंबर 21, 2007 at 5:11 AM
गूलल रीडरवर गूगल रीडर बद्द्ल वाचून आनंद झाला. आपण देखील ही टिप्पणी गूगल रीडरवच वाचाल अशी अपेक्षा आहे.
भेसळ टाळण्यासाठी वेगवेगळ्या भाषेतील वाचकांसाठी वेगवेगळ्या अनुदिन्या लिहीणे हा एक पर्याय आहे. (जोवर ठराविक टॅग साठी आर. एस. एस. फीड देता येत नाही तोवर.)
Posted by माझी दुनिया on डिसेंबर 21, 2007 at 8:22 AM
शैलेश,
मी सुध्दा गुगल रिडर वापरते. आणि त्यासारखा उत्तम फीड रीडर नाही. याचे कारण; गुगल एकही पोस्ट डिलीट करत नाही. त्यामुळे काही दिवस वाचायला नाही मिळाले तरी सगळॆ लेख जागच्या जागी असतात. शिवाय ऑनलाईन असल्याने नियमीत फिड्स डाऊनलोड करून घ्यायची भानगड नाही.
परंतु तुम्ही जो भाषानिहाय स्वतंत्र वाहिन्यांच्या प्रकाशनाबाबत जो प्रश्न उपस्थित केलात, तो सहज शक्य आहे. तुम्ही गुगल रीडर मध्ये वाचल्या जाणा-या प्रत्येक लेखाला तुमच्या मर्जीने हवे ते ’टॅग’ करू शकता. समजा तुमच्या ४ मित्रमैत्रिणींचे मराठी भाषेतले काही लेख तुम्ही ’मराठी’ या नावाने टॅग केलेत. तर तो टॅग ही तुम्ही शेअर करू शकता. एकाच लेखाला तुम्ही अनेक नावांनी टॅग करू शकता. आणि प्रत्येक टॅग तुम्ही स्वतंत्र पणे शेअर करू शकता. सेटींग्ज….टॅग…त्यापुढे …फीडच्या च्या चिन्हावर टीचकी दिली की झाले काम.
मला वाटते हे जास्त सोपे झाले. आपल्या मर्जीने ..आपल्याला हव्या त्या नावाने आणि फक्त हवे तेच लेख आपण शेअर करू शकतो. फक्त टॅगींग मात्र योग्य पध्दतीने व्हायला हवे.
Posted by देविदास देशपांडे on डिसेंबर 21, 2007 at 1:25 PM
शैलेशजी,
मीही गुगल रिडरचा फॅन आहे. त्यांच एक कारण म्हणजे आपल्या आयगुगलच्या मुख्य पानावर गुगल रिडरचे विजेट लावता येते. त्यामुळे प्रत्यक्ष रिडरच्या साइटवर जाण्याची कटकट राहत नाही. बाकी तंत्रज्ञान विषयावरील तुमचे लेख छानच. आमच्यासारख्यांची चांगली सोय होते.
Posted by Shailesh S. Khandekar on डिसेंबर 23, 2007 at 10:00 AM
आशुतोष, माझी दुनिया, देविदास देशपांडे,
आपल्या अभिप्रायांसाठी शतशः आभार! ‘माझी दुनिया’ यांनी सुचवल्याप्रमाणे टॅग किंवा शब्दखूणा वापरायची सोय उत्तम आहे. सध्या त्याची चाचणी घेतोय. यथावकाश त्याचाही दुवा प्रसिद्ध करेलच,