गुगलला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रिय गुगल,

तुझ्यासारख्या अलौकिक हुडक्याची भेट होवोन दहा वर्षे झालीत हे अजुनही खरं वाटत नाही. अस्सल पुणेरी भाषेत, ती अगदी परवाचीच गोष्ट वाटते. या काळात विशेषतः तंत्रज्ञाच्या क्षेत्रात कितीतरी गोष्टी बदलल्या, त्या इतक्या प्रमाणात बदलतील असे स्वप्नातही वाटलं नव्हतं. या सगळ्या बदलांचा सकारात्मक उत्प्रेरक असूनही तू तुझा मुळ स्वभाव तसाच कायम ठेवला ही अधिक समाधानाची बाब आहे. ज्ञानाच्या अथांग आकाशाला आणि आकाशगंगेच्या अथांगतेला गवसणी घालण्याचे तुझे वेड दिवसेंदिवस अधिक विलोभनीय भासते. साधी गोष्ट म्हणजे सोपं काम नाही हे तू सगळ्यांना पटवून दिलंस. वाढत्या वयापरत्वे तू वाहवत चालला आहेस की काय अशी टिका करणा-यांकडे मी सदैव दुर्लक्षच करतोय. तसंही, टिकाकारांचे दगड पडल्याशिवाय मोठेपण सिद्ध होत नाही. तू आपला चांगला स्वभाव असाच कायम राहू दे, झालं.

तुझी सृजनाची उर्मी पाहिली की मस्त वाटतं. एक प्रेमळ सल्ला – तसा तू चतुर आहेसच. तरीपण, सांगावेसे वाटते म्हणून बोलतो. तुझ्याकडील गुणवंत, रत्ने चांगली सांभाळून ठेव – रॉब पाईक आणि पीटर नोर्व्हीग यांच्यासारख्या प्रज्ञावंतांचं मोल त्यांची हिरे-सोन्यानी तुला केल्यावरही कांकणभर अधिकच असते. असे लोक घडवल्या जाऊ शकतात हा आदर्शवाद मानण्यावाचून गत्यंतर नसले तरी ते व्यावहारिक सत्यापासून मैलोगणती दूर आहे हेही तितकेच खरे!  बाकी अजून काही बोलण्याची गरज आहे असे वाटत नाही.

वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. अजून मोठा हो, :)

शैलेश श. खांडेकर