नुकताच गाझा पट्टीत संघर्षाचा भडका उडाला आहे. त्याचे दुर्दैवाने युद्धात रूपांतर होईल का हा मोठाच गहन प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरावर आंग्ल वर्ष २००९ कसे जाईल याचा अदमास घेता येईल. आपल्याकडे इस्त्राएलबद्दल पुरेसा अभ्यास केला जातो अथवा नाही याबाबत शंकाच आहे. त्या दृष्टीने गाझा संघर्षावर इस्त्राएली अध्यक्षांचे विधान अभ्यासण्याजोगे आहे. या विधानाचा अभ्यास करतांना काही गोष्ट ठळकपणे जाणवतात – नेतृत्वाचा कणखरपणा आणि मुद्देसूद विचार मांडण्याची हातोटी. त्यावर अरब जगताच्या प्रतिक्रियाही अभ्यासण्याजोग्या आहेत.
आगामी काळात भारताची भूमिका ही आंतरराष्ट्रीय राजकारणांस दिशा देणारी असावी. त्या दृष्टीने आपल्या येथिल राज्यकर्त्यांकडून नेतृत्वाच्या बाबतीत, किमान अशाच प्रकारच्या उच्च गुणवत्तेची, अपेक्षा आहे. त्यासाठी समाजाला जोडणारी भूमिका असावी लागते. एकसंध समाजातून कर्तृत्ववान व्यक्तींना पुढे आणण्याची प्रक्रिया अखंड सुरू असावी लागते. यामध्ये वृत्तपत्रे आणि वाहिन्या यांची वार्तांकनाची हातोटीही महत्त्वाची ठरते. मुंबईवरील हल्ल्याचे प्रकरण ज्या रितीने हाताळल्या गेला त्याचा विचार करता सगळ्याच आघाडीवर आपणा सर्वांना अमूलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
वैयक्तिक पातळीवर आपण काय करू शकतो? याचे उत्तर साधे आहे आणि काहीसे सहज रितीने अंमलातही आणल्या जाऊ शकतो. इतिहास घडतांना त्याचा बारिक अभ्यास करणे ही त्याची प्रथम पायरी आहे. जगात आजूबाजूला काय घडत आहे यावर लक्ष असायलाच हवे. त्यासाठी केवळ वृत्तपत्रे किंवा वाहिन्यांनी केलेले वार्तांकन पुरेसे नाही. आपणही इतर वृत्तोगमांचा जाणिवपूर्वक शोध घेतला पाहीजे आणि सत्य काय असेल यावर विचार अवश्य करायला पाहीजे. त्यातूनच, एखाद्या वृत्तपत्राचा खोटारडेपणा किंवा बावळटपणा आपल्यासमोर येऊ शकतो. देशी वृत्तपत्रे तसे खोटारडेपणा करतातच असे म्हणे कदाचित अयोग्य ठरेल. परंतू, पाकिस्तानला भारतीय वृत्तपत्रातून ज्या त-हेने सुयोग्य प्रसिद्धी मिळते, ती पाहता त्यांचे बरेच पंचस्तंभीय मित्र येथे असण्याची शक्यता नाकरल्या जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेवर बंदी घातल्यावर तेथील अल्पसंख्यांनी निदर्शने केल्याचे छायाचित्र लगेचच हल्ल्यानंतरच्या काही दिवसताच येथील वृत्तपत्रात आले. आता हे छायाचित्र भाडोत्री कलाकारांना घेऊन काढल्या गेल्या नसेल काय? हा येथील वृत्तपत्रांचा खोटारडेपणा नसला तरी बावळटपणा नाहीच असे कुणीही सूज्ञ मनुष्य म्हणावयास धजेल काय? या सर्वामुळे आपल्याच प्रगतीत खीळ बसते. कारण, वैचारिक घाण व बावळटपणा ही समाजातील सगळ्याच घटकांचे नुकसानच करते.
स्वतःच्याच मेंदूने विचार करणे ही सक्षम नागरिक होण्याची एक मुख्य पायरी आहे. वडिलधारी मंडळी सांगूनच गेलीत, “ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे.” येथे जन म्हणजे आंतरराष्ट्रिय समुदाय आहे. आपण सर्व सुशिक्षित आणि विचारी नागरिक आहोतच. मात्र, सामाजिक बाबतीत हा विचार खरंच आपण आपल्याच मेंदूने करतो की आपल्याला दिलेल्या भूलीतच आपण जगतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या क्षणी प्रत्येक नागरिक हा भूलीच्या बाहेर असेल त्याच क्षणी भारत जागतिक महासत्ता झालेला असेल. जसा सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीस होतो, अगदी तसाच!
दुवे -
१. इस्त्राएली अध्यक्षांचे विधान
२. गाझा संघर्षाबाबत गुगलवरील बातम्यांचे दुवे
