नवीन इंग्रजी वर्ष आणि अंतरिक्ष

अंतराळवीर म्हटले की त्यांचे विशेष पोशाख आठवतात चटकन डोळ्यासमोर अंतरिक्षयानाची प्रतिमा उभी ठाकते. राकेश शर्माचा चेहेरा स्मरतो. इस्रोचे चांद्रयान हे शब्द जरी उच्चारले तरी मन मोहोरून उठते. खरंतर ब्रह्मांडाच्या इतक्या पसा-यात एका चिमुकल्या ग्रहावर आपण वास्तव्य करतो. तिच्याच उपग्रहाजवळ आपण पाऊल ठेवून कितीतरी काळ लोटला आहे. या दोहोंच्या मध्ये कुठेतरी अंतराळगृह स्थापलेले आहे. तिथल्या अंतराळवीरांचे दैनंदिन जीवन कसे असेल? ते काय करत असतील? या सगळ्यांचा विचार करणे ही मौजेची बाब आहे. विश्वजाळावर ही माहिती तात्काळ मिळू शकते. मात्र, मला एक कुतूहल आहे.

एखाद्या कवीला त्यांनी खरंच अंतराळयानात बसवून पृथ्वीचे दर्शन घडवले तर काय होईल?बहुधा तो आनंदाने वेडाच होईल! वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी किंवा अंतराळगृहाची तेलपाणी करण्याची काम करतांना अंतराळातील पायपीट ही नित्य घटना आहे. परंतू, एखाद्या निमित्ताने त्यात मग्न असतांना अवचित इलेकडे दृष्टी विसावली तर धरित्री सस्यशालिनी या उक्तीची आठवण होणे सहज क्रम आहे. तेथून इवलीशी दिसणारी इला, ही विशालकाय पृथ्वी, आपल्या सगळ्यांचा भार सहन करते. तिच्या तितिक्षेची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

यावरूनच प्राचीन ऋषींना वसुधैव कुटुंबकम् असे तर सुचले असेल का? अंतराळातील खडतर परिस्थितीतही टिकून, नियमीत कामे करण्याची उर्मी त्या वैज्ञानिकांमध्ये कशाने येत असेल? खरंच, त्यांचे कौतुक करण्याचीच ही गोष्ट आहे. आपलं आयुष्य अशा विविध गोष्टींनी समृद्ध झाले आहे. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळगृहातून येणा-या नवीन इंग्रजी वर्षानिमित्त संदेश पाठवला आहे. त्याबद्दल आपल्याला खालील दुव्यावर अधिक माहिती मिळू शकेल.

येत्या नवीन इंग्रजी वर्षात अंतरिक्ष तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल उत्साहवर्धक बातम्या ऐकायला मिळतील अशी आशा करू या.

इंग्रजी दुवा – http://www.nasa.gov/home/hqnews/2008/dec/HQ_M08270_NASA_TV_to_air_ISS_message.html

(शैलेश श. खांडेकर)

One Response to this post.

  1. Posted by pranit adkankar on डिसेंबर 30, 2008 at 2:40 PM

    navin varsha 2009 chya hardik shubheccya.

Comments are closed.