इंग्रजी नवीन वर्ष – मनोरथ आणि सिद्धी

२००८ हे एक गतीमान वर्ष होतं. समुद्राच्या किनारी पडलेली वाळू ओंजळीत घ्यावी आणि ती धरून वा-याशी मस्ती करत सुसाट सुटावं. गंतव्यापर्यंत पोहोचेस्तवर लक्षातही येत नाही, की सगळी वाळू ओंजळीतून आधीच निसटली आहे. भान आलं की उस्फुर्त उद्गार येतो, “अरेच्च्या गेलं की एक वर्ष!” वास्तविक आपलं वर्ष सुरू होतं ते गुढीपाडव्याला. ते खरं संवत्सर! पण, मला इंग्रजी वर्षही कुठेतरी नक्कीच आवडतं. संवत्सर हा शब्द उच्चारला की कानात गंधर्वांचे सुर घोळतात. तर, न्यू ईयर म्हटले की पियानोची सुरावट गुदगुल्या करून जाते. सुरांची मेजवानी कुठेही मिळाली तरी काय फरक पडतो? अगदी दंतपक्तींतूनही मिळाली तरी त्यात लज्जत असते. बाकी, डिसेंबरच्या शेवटी थंडी ही आपले अस्तित्व पूर्ण दंतपंक्तींनिशी निशिदिनी दाखवत असते. हिवाळ्याचे रूपडे न्यारेच असते. वर्षभर विविध उत्सव असणे हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मात्र, हिवाळ्याची शान म्हणजे दिव्यांची फुले होत. गगनीच्या तारकामंडलांना दृष्ट लागू नये म्हणून ती याच काळात अलगद धरित्रीवर आणून ठेवलेली असतात.

गायनाच्या मैफिली जमतात, तशाच गप्पांच्याही घडतात आणि गरम चहाने त्यांची सांगता होते. एखाद्या लहान मुलाला जसे एकाच खोलीत कोंडणे ही जशी शिक्षा आहे ना तसेच काहीसे पावसाळ्यात निसर्गाच्या प्रकोपाने आपल्या मनाचे झालेले असते. मात्र, हेच मन हिवाळ्यात संपूर्ण यौवनात बहरते. त्यातच दिवाळीसारखा मोठाच सण येतो. चोहींकडे कसे आनंदाचे वातावरण असते. अशातच इंग्रजी नवीन वर्ष येते. त्याचीच एक पद्धत म्हणून मनोरथ मोठ्या उत्साहात केले जातात. अनुभवी मनोरथी एकही मनोरथ न करण्याचे दृढ मनोरथ चालवतात. बाकी, पुढचं सांगायची आवश्यकता नाही. असले मनोरथ पूर्ण कधी करायचे असतात का? पण, तरीही मनोरथ करण्यात एक वेगळी मजा आहे.

म्हणून नेहेमीच्या उत्साहाने मी एक मनोरथ करायचे ठरवले आहे. त्या मनोरथाचे अश्व बहुधा मनोवेगानेच चौखुर उधळतील याचा गाढ विश्वास आहे. तरीही, मनोरथ हा हवाच. कारण, कधी-कधी एखादी गोष्ट करण्याऐवजी तीच्या मनोरथाचीच मजा अधिक असते. बाकी पहाटे लवकर उठणे वगैरे अघोरी विचारही नको. काहीतरी वेगळं आणि अर्थपूर्ण करायचं.

तब्बल पाच शतके आधी मायकेल दे मॉन्तैने या फ्रेंच निबंधकाराने एक मजेशीर निरिक्षण नोंदवले होते, “प्रत्यक्ष साहित्यकृतीचा रस ग्रहण करण्याऐवजी रसग्रहणाचे रसग्रहण करणे हा मोठाच व्यवसाय झाला आहे आणि इतर कोणत्याही विषयाऐवजी ग्रंथांबद्दलच अधिक ग्रंथ आहेत – आपण काहीही न करता केवळ एकमेकांनाच उजाळा देत असतो.” त्याचा रोख अहो रूपम् अहो ध्वनीम् या त-हेकडे होता. काळाचा पट त्यावेळेस रेनैसान्स चळवळीकडे सुई दाखवत बसला होता. याच ओघाने विचार करता इंग्रजी नवीन वर्षात काय मनोरथ करायचे ते मनात आले. आणिक, गेल्या कित्येक वर्षांपासून यशस्वीपणे निभवत असलेले मनोरथ पुन्हा करायचे ठरवले, :)

जग, कुठलेही भिंग न लावता, जसं असेल तसंच पहायचं आणि समईलतल्या दिव्याचा जसा अनिमिष नेत्रांनी आस्वाद घेतो तसा मनसोक्त आस्वाद घ्यायचा. सुखी होण्यासाठी उद्याची वाट न पाहता या क्षणापासूनच आनंदी व्हायचं.

पुन्हा भेटूच, नवीन इंग्रजी वर्षात!

(शैलेश श. खांडेकर)

यदृच्छ दुवा – मायकेल दे मॉन्तैने