वर्डप्रेसच्या मुक्कामी दोन वर्षे

विदग्धचे दोन वर्षांपूर्वी वर्डप्रेसवर स्थलांतर झाले आणि आता हाच कायम पत्ता झाला आहे. या काळात अनेक रचना लिहिल्या गेल्या. त्या लिहितांना मला खूप शिकायला मिळाले. कित्येकदा आपल्या मनातील विचार हे संगणकाच्या पडद्यावर दृश्य रूपात पाहतांना अधिक स्पष्ट होत जातात हा नवाच अनुभव मिळाला. त्यातूनच आपण अधिक उच्च गुणवत्तेच्या विचारांच्या कक्षेत दीर्घकाळ भ्रमण करू शकतो हेही जाणवले. तो आनंद खरे तर शब्दातीत आहे. पण, त्याला शब्दात बांधण्याचा यत्नही तितकाच आनंददायक आहे. मला वाटते की एखाद्या कल्पनेचा धांडोळा घेत जेव्हा बुद्धी विश्वातील विविध अशा सुंदर आणि अद्भूत विचारांना स्पर्श करून येते तेव्हा तो प्रवास हे सर्वाधिक तोषवणारे पारितोषिक आहे.

ओघातच बहुवार्षिक रचनांबद्दल थोडेसे बोलणे यथोचित होईल. त्यापैकी मेघदूताचा काव्यानुवाद सुरू केला. तो अजूनही सुरूच आहे. पडद्यांची झुंज हे नाटक सुरू केले. पण, नंतर त्याला आवश्यक असणारा वेळ काही देवू शकलो नाही. तरीही, ते नंदनच्या इच्छेला मान देऊन पूर्ण करायचेच असे ठरवले आहे. साहित्यिक्सचा एकच भाग लिहीला. मात्र, त्याचे कादंबरीत का रूपांतर करीत नाही असा विशालने प्रश्न विचारला होता. खरं सांगायचं तर त्यावेळेस मनात कादंबरीविषक विचारही नव्हता. परंतू, त्या प्रश्नामुळे ही कल्पना मनात घोळत आहे. अर्थातच, ती मला आवडली असल्याने कधीतरी कादंबरी होईलच. सखे ही कादंबरी सौभाग्यवतीच्या इच्छेखातर सुरू केली. अठ्ठावीस प्रकरणे लिहील्यावर त्यातील कथावस्तू आणि सादरीकरणातील काही दोष मला कंटकासम त्रास देताहेत. त्यामुळे ती पूर्ण करतांना अक्षरशः पुनश्च हरिओम् करावा लागणार असे दितसतेय. एकूण, दोन वर्षात बरेच काही मिळवले असले तरी जबाबदा-याही प्रचंड वाढल्या आहेत. त्या एकाच वर्षात पूर्ण करणे शक्य होईल अथवा नाही हे मला खरंच ठाऊक नाही. कोणती रचना केव्हा पूर्ण होईल यावर खल करण्यापेक्षा ती अधिक समृद्ध कशी होईल यावर भर देत आहे.

स्फुर्ती ही काही घड्याळाच्या हाताला बांधलेली नसते आणि घड्याळही स्फुर्तीसाठी थांबत नाही. त्यामुळे जे वेळी त्या पूर्ण होतील, तीच त्यांची योग्य घडी म्हणायचे. तसंही, थोरा-मोठ्यांच्या शब्दात, काही बाबतीत तो संकल्प पूर्ण होण्यापेक्षाही ते स्वप्नरंजनच अधिक सुखावह असते, होय ना? :) येथे मराठी ब्लॉग विश्वचा निर्माता, पवन याचाही उल्लेख अवश्य केला पाहीजे. अनंत या लेखमालेतील पहिल्याच लेखावर त्याने दिलेला अभिप्राय हासुद्धा एक स्वतंत्र लेख म्हणू शकतो. एवढा चांगला अभिप्राय आपल्यालाही देता यावा यासाठी मी सदैव यत्न करत असतो.

एवंच् नकळतच, २ जानेवारी हा विदग्धचा वर्धापनदिन झाला आहे. गंमतीचा भाग म्हणजे त्यावळेस मला मराठीतील अद्यावत अशी फारशी माहिती नव्हती. त्यामुळे एक योगायोगाची गोष्ट कालच ठाऊक झाली. काल ‘सकाळ’ या मराठीतल आघाडीच्या वृत्तपत्राचा वर्धापन दिन होता. त्यांनाही खूप-खूप शुभेच्छा. ‘सकाळ’चे सामाजिक उपक्रम हा चांगला भाग आहे. मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात त्यांना एक मानाचे स्थान आहे आणि ते पुढेही राहील अशी आशा आहे. असो.

एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाची नांदी आहे. या काळातही माय-मराठी अनेक सुंदर रूपे लेऊन प्रकटत आहे. ते पाहून अतिशय आनंद वाटतो. भोवती अनंत तारे चमकत असतांना विदग्ध ही त्यातील छोटीश समई आहे ही माझ्यासाठी खचितच आनंदाची बाब आहे. या सर्वच वाटचालीत आपल्या लोभाच्या चंद्रकिरणांचा शिडकावा कित्येक खाच-खळग्यांवर उतारा झाला आहे. त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार!

स्नेहांकित,

शैलेश श. खांडेकर

2 Responses to this post.

  1. लेख प्रकाशित करतांना दोन वर्षे असे लिहिले आहे ते कृपया तीन वर्षे असे वाचावे, मन अजूनही २००८ च्या पूर्ण बाहेर आले नाही ही त्याची खूण आहे, :)

  2. अभिनंदन! विदग्धवर उत्तरोत्तर असेच वैविध्यपूर्ण लेखन वाचायला मिळो. विदग्धच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!

Comments are closed.