अग्नीवाद्ये

युद्धस्य कथा रम्यः ही उक्ती ऐकायला जरी रमणीय वाटत असली तरी प्रत्यक्ष युद्ध हे त्यात सहभागी होणा-या समुहांच्या नागरिकांसाठी दाहकच असते. स्फोटानंतरच्या किंकाळ्या ह्या कुणाही सूज्ञ मनुष्याच्या हृदयांस घरे पाडल्यावाचोन जाणे अशक्य आहे. मात्र, व्यावहारीक जगाचा विचार करता, युद्ध ही एक अपरिहार्यता असते आणि ते आपण सुरू करतो वा एखादा शत्रूदेश ह्याला त्याच्या संहाराशी तसा फारसा संबंध नसतो. या कटू गोष्टीवर विचार करतांना सहज विश्वजाळावर भ्रमंती करतांना अग्नीवाद्यांबद्दल वाचनात आले आणि कुतूहल जागृत झाले. वास्तविक अग्नीचा संबंध आपण अन्न शिजवण्यापासून ते चिता भस्म करण्यापर्यंत अनेक गोष्टींशी जोडतो. त्यात संगीताही सामिल झाले हे वाचून नवलच वाटते.

अग्नीवाद्यांपैकी एक म्हणजेच स्फोटवाद्य (पायरोफोन) ! यांत ज्वलनशील वायुंचा एका भव्य कुपीत कमी-अधिक प्रमाणात स्फोट करून सूर निर्माण केले जातात. ज्याप्रमाणे संवादिनीवर सुरांसाठी विविध कळी असतात त्याप्रमाणे हा प्रकार असतो. मात्र, संवादिनीत एखादी कळ दाबली की त्या-त्या कळीच्या अनुषंगाने असलेली धातूची पट्टी हवा बाहेर जातांना कंप पावते आणि सूर येतो. स्फोटवाद्यामध्ये मात्र प्रत्येक सुराचे अनुषांगाने कळीचे काय वजन पडले असता स्फोटानंतर योग्य सूर येईल त्याचे गणित केलेले असते. त्यावरून पाश्चात्य पद्धतीचे पूर्ण सप्तक त्यात बसवलेले असते. काही उत्साही लोक निकामी झालेल्या गाड्यांचे भाग या स्फोटवाद्यात रूपांतरीत करतात. तर, काही वीर चक्क ठीकठाक असलेल्या गाडीच्या यंत्रभागाचे स्फोटवाद्यांस पोषक ते बदल करतात. म्हणजे, गाडीला इंधन जास्त लागते, परंतू ती चालू असतांना संगीत वाजवत-वाजवत जायचे. आपल्या गावाकडे बैलगाड्यांमध्ये बैलांच्या गळ्यात घंटा वापरण्यासारखा प्रकार म्हणायचा.

मनुष्याची कल्पनाशक्ती कोणत्या दिशेला कशी जाईल आणि त्यातून काय-काय समोर येईल हे एक इंद्रधनुष्यच आहे. आपल्याकडे एखाद्याला चांगला चोप देणे या अर्थाने ‘त्याला वाजवले’ असा शब्दप्रयोग केला जातो. त्यात थोडासा बदल करून असे सुचवावेसे वाटते की, निर्दोष नागरिकांचा बळी घेणा-या दहशतवादी शक्तींचे, खरोखरच किमान एकदा तरी, भारताने जोरदार अग्नीवाद्य वाजवायलाच हवे. हे जेव्हा होईल तेव्हा खरे. तोवर, आपण अग्नीवाद्यांविषयी अधिक माहितीचा आस्वाद खालील दुव्यांवर घेऊ शकता.

इंग्रजी दुवे -

१. http://en.wikipedia.org/wiki/Pyrophone
२. http://oddstrument.com/2008/08/29/pyrophones-and-explosion-organs/

(शैलेश श. खांडेकर)

To my non-Marathi friends, this article speaks about musical instruments that work on fire, and the combustion principle. To repeat, this is NOT anyway related to ANY explosive devices. If you quote the article, please carry due diligence to avoid misquoting it. That will be a great service to your readers. Thank you for your kind co-operation.