“आज स्त्रीमुक्तीदिन आहे. आज मी काहीही करणार नाही.” काल, भल्या सकाळी सौभाग्यवतीने गंमतीने म्हटले आणि हल्ली स्त्रीयांना किती स्वातंत्र्य आहे यावर आमची चर्चा सुरू झाली.
मला वाटते की बाराव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत एखाद्या देशाची वैचारिक अधोगती कोणत्या थराला जाऊ शकते आणि त्यातून तो संस्कृतीमुल्यांमुळे कसा वर येऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण आपण आपल्या सभोवती बघत आहोतच. मेकॉले जेव्हा भारतात आला तेव्हा त्याने येथे काय पाहीले यावर त्याकाळच्या ब्रिटिश संसदेत जे उद्गार काढले त्यातील एक-दोनच वाक्ये वानगीदाखल पुरेशी आहेत, “संपूर्ण देशात मला एकही भिकारी आढळला नाही. लोक आपल्या शब्दाला प्राणापलिकडेही जागतात.” आज हे उद्गार वाचले तरी हसू यावे अशी परिस्थिती आहे. लांगूलचालन या शब्दाऐवजी मनुष्यचालन हा शब्द प्राण्यांनी शोधून काढला तरी त्याचा राग येऊ नये असे वातावरण आहे.
मध्ययुगीन काळातील युरोपातील महिलांच्या जीवनाबद्दल मीना प्रभूंनी “आम्हा बायकांचा जन्म” नावाचा लेख कालनिर्णयच्या २००८ च्या दिनदिर्शिकेत नोव्हेंबर महिन्यात लिहीला होता. त्यातले परिच्छेद वाचले की अंगावर शहारा येतो. “कामानिमित्त दूर गेलेल्या युरोपियन नव-याला आपल्या बायकोच्या शीलाची तुफान धास्ती. त्याला निःशंक करण्यासाठी, ‘चॅस्टिटी बेल्ट’ शोधून काढला. तो लोखंडी लंगोट सतत वापरयाचा. त्याला कुलुपदेखील लावलेलं असे. त्याची किल्ली तो स्वतःबरोबर घेऊन जाई. तो परल्यानंतरच बायकोची सुटका व्हायची. आपले मराठे शूरवीर लढाऊ मोहिमांवर महिनोन् महिने घराबाहेर असत. पण त्यांनी आपल्या बायकांवर ही विचित्र सक्ती कधी केली नाही. आपल्या घरधनिणीच्या घट्ट कासोट्यावर त्यांचा पुरा विश्वास होता.”
या वर्णानावरून आठव्या शतकातील आदि शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा तात्त्विक वाद आठवतो. आदि शंकराचार्य हे अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते तर मंडनमिश्र हे कर्ममार्गाचे प्रणेते. जो वादविवाद जिंकेल त्याचे शिष्यत्व दुस-याने स्वीकारायचे असे ठरले होते. त्यांच्या सैद्धांतिक चर्चेत कित्येक दिवस लोटले. अखेर आदि शंकराचार्यांनी यशस्वी रितीने अद्वैतसिद्धांत प्रतिपादन केला आणि मंडनमिश्रांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. या वादविवादात अंतिम निर्णायाचा अधिकार कोणास होता हे पाहीले तर भारतवर्षाची उज्ज्वल बाजू समोर येते. या अत्युच्च तात्त्विक वादामध्ये तो मंडनमिश्रांच्या पत्नी, उभयान्वयी देवींना होता. स्त्रीला जगन्मातेचे रूप म्हणून पाहणे हा काही वैचारिक अपघात असू शकत नाही. त्यासाठी सुसंस्कृतताच लागते. परस्त्रीस मातेपरी मान द्यावा ही शिकवणही त्यातूनच अंगवळणी पडते.
दुर्दैवाने आपल्या उच्च संस्कृतीमूल्यांशी फारकत घेतल्याने भारत एका पराभवाच्या निराश गर्तेत फेकल्या गेला. तत्त्वज्ञानाचा आपल्या सोयीप्रमाणे चुकीचा अर्थ लाऊन दुःस्सह अवमूल्यन झाले. आणि आज एके काळी ज्यांना आपल्या येथील स्त्रीयांना एक मनुष्य म्हणूनही नीट वागणूक देता येत नव्हती अशा रानटी देशांकडून संस्कृती शिकण्याची पाळी आली. मात्र भारताचा हजारो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास बघता राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, राणि चेन्नम्मा यांच्यापासून ते लता मंगेशकर, शांता शेळके यांच्यापर्यंत अनेक कर्तृत्वान स्रीया झाल्यात या आश्चर्य ते कोणते? पण, मध्ययुगातील, विशेषतः गेल्या दोनशे वर्षातील परिस्थिती पाहता नवल वाटणे स्वाभाविकच आहे. या दृष्टीने अलीकडील काळात सावित्रीबाई फुलेंचे कार्य एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे झळाळले.
जे इतिहासापासून धडा घेण्याची तसदी घेत नाही त्यांना इतिहास क्षमा करत नाही. आगामी काळात बुरसटलेल्या पाश्चात्त्य विकृतींच्या ओंजळीतून तत्त्वज्ञानाचे पाणी पिणे दुष्परिणामकारकच आहे. सुदैवाने आज याबाबतीत आशेची किरणे दिसत आहेत. राजकारणापासून तर व्यवस्थापनापर्यंत स्त्रीयांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. देशातील एका अग्रगण्य बॅंकेच्या मुख्याध्यक्षपदी एका स्त्रीची निवड जाहीर झाली आहे. स्त्री असो वा पुरूष, कर्तृत्वाला समान संधी ही प्रत्यक्ष आचरणातील बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाचीच आहे. सारांश, आपल्या उच्च सांस्कृतिक मूल्यांचे पुर्नोत्थापन हीच सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली ठरत आहे.
(शैलेश श. खांडेकर)
