धाविनी

गर्भाज्ञायन (कर्नेल प्रोग्रॅमिंग) ही आज्ञायनाची एक विकसित आणि क्लिष्ट शाखा आहे. त्यात काम करणे ही आज्ञायनाच्या क्षेत्रात प्रतिष्ठेची बाब मानल्या जाते. आपण संगणकात एखादे पत्र लिहीत असू, गाणे ऐकत असू किंवा चक्क खेळ खेळत असू, मायाजाळाची भटकंती असो वा परदेशातील नातलगांशी स्काईपवरून संभाषण, या सगळ्यांच्याच मागे संगणकातील संविधी आपले कार्य चोख बजावत असते. संविधी म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टिम्. या संविधीचा संगणकाच्या भोक्त्यास पूर्णतः अदृश्य असणारा भाग म्हणजेच गर्भ, ज्यांस इंग्रजीत कर्नेल अशी संज्ञा आहे. गर्भाज्ञायनात संगणकाच्या समूर्तकाशी (हार्डवेयरशी) थेट संबंध येतो. त्यामुळे त्यात समूर्तक (हार्डवेयर) आणि संचेतक (सॉफ्टवेयर) या दोन्ही शाखांचे प्रगत ज्ञान आणि तंत्रज्ञान वापरणे आवश्यक ठरते.

आता विषयवस्तूकडे वळू या. गर्भाज्ञायनातीलच एका उपशाखेचा संबंध हा विदा प्रत्यक्ष साठवणारी उपकरणे, जसे तबकड्या किंवा विदिवा (फ्लॅश ड्राईव्ह) यांच्याशी येतो. त्या शाखेला धाविनी हा प्रतिशब्द योजत आहे. “धारणी विधी” म्हणजेच फाईल सिस्टीम, यात शब्दांची आद्याक्षरे घेतली की धावि हा शब्द मिळतो. परंतू, तो मराठीतील धावणे या क्रियापदाच्या विविध रूपांशी मिळताजुळता असल्याने गोंधळ होण्याचा संभव आहे. त्यास्तव, त्यास धाविनी म्हणणे अधिक योग्य ठरेल. फाईल सिस्टिम ऐवजी धाविनी हा शब्द उच्चारास सोपा आणि सुटसुटीत आहे. आपणही तोच वापरू या. तसेच, विदा धारण करणा-या उपकरणांना इंग्रजीत स्टोअरेज डिव्हाईसेस म्हणतात, त्यांना विदाधी असे म्हणणेही उचित ठरेल. धी म्हणजे पृथ्वी, जी आपणा सर्वांचा भार सहन करते त्या अर्थाने विदाचा भार सहन करणारे उपकरण ते विदाधी, असा शब्द योग्य वाटतो. आपणांस अधिक चपखल शब्द सुचल्यास तो या लेखावरील अभिप्रायात अवश्य द्यावा.

विदा प्रत्यक्ष साठवणारी उपकरणे ही समूर्तकाच्या नियमांनी बांधलेली असतात. तेथे, मुळात भौतिकशास्त्रातील विधीनिषेधांचे राज्य असते. उदाहरणार्थ, चुंबकीय तबकडीवर हजारो-लाखो वर्तुळे असतात. प्रत्येक वर्तुळात चुंबकीय अधिभार {आहेरे, नाहीरे} अशा अनेक जोड्या असतात. गणितीयदृष्ट्या आणि कणभौतिकीचा विचार केला तर या जोड्या अक्षरशः निखर्वावदी (१०००० अब्जावधी) असू शकतात. परंतू, त्या वर्तुळातून वाचन करणारे विदाक्ष (हेड) इतके प्रगत नाही. त्यामुळे, त्यातून मर्यादीत प्रमाणातच अधिभार वाचल्या अथवा लिहील्या जाऊ शकतो. म्हणून चुंबकिय अधिभाराचे क्षेत्र काय, याचा निर्णय अंतिमतः भौतिकशास्त्राच्याच कक्षेत येतो. याऊलट, एखादा भोक्ता किंवा वापरकरी संगणक कसा वापरतो ते पाहिल्यास आकाश आणि पाताळाएवढे अंतर ध्यानी येते. कोणताही भोक्ता तबकडीतील वर्तुळांच्या रूपात आपल्या विदाची साठवण करण्याचा विचार करत नसतो. संगणक वापरतांना भोक्त्याच्या मनात लेख, कविता, प्रकल्प, चित्र इत्यादी कल्पना असतात. या कल्पनांना धारणीचे रूप दिलेले असते. त्यामुळे अमुक एक लेख त्या धारणीत आहे असा विचार भोक्त्याच्या मनात येत असतो. थोडक्यात समूर्तकाच्या संदर्भात विचार करता तबकड्यांवरील वर्तुळे आणि संचेतकाच्या संदर्भात विचार करता धारणी, असा विदाचा प्रचंड अवाका आहे.

वापरिका (ऍप्लिकेशन) लिहीणा-यास जर तबकड्या आणि वर्तुळे इत्यादी गोष्टींची काळजी घ्यावी लागली तर चांगल्याच काय, अगदी पिटुकल्या वापरिकाही बनणे दुस्तर आहे. येथेच संविधीचा संबंध येतो. समूर्तकातील भौतिकशास्त्राचे कठोर नियम आणि संचेतकातील द्राव्य सुलभतेची गरज यांची सुयोग्य सांगड घालणे हाच संविधीचा मुख्य उद्देश्य असतो. संविधीच्या गर्भातील धाविनी हा विदाच्या प्रचंड पसा-याचा द्रोणागिरी उचलण्याचे कार्य करते. त्यामुळे, विदा तबकडीवर साठवतांना कोणती धारणी कुठल्या वर्तुळात किंवा वर्तुळांच्या पुंजक्यात ठेवायची. तसेच, या सर्वांची सूची संतत अद्ययावत कशी राहील याची आज्ञावली म्हणजेच धाविनी! अधिक विचार करता एक गोष्ट चटकन ध्यानी येते. ती म्हणजे, धाविनी ही केवळ आज्ञावली नसून, विदाचे तबकडीवर कसे व्यवस्थापन करायचे याची नियमावलीही असते. साहजिकच, प्रत्येक संविधीगणिक अशी वेगळी धाविनी असते. लिनक्स सारख्या प्रगत संविधीत इतर संविधींच्या धाविनी वाचण्याची तसेच लिहिण्याचीही सोय असते.

लिनक्समध्ये विदा साठवण्यासाठी ईएक्सटीएफएस या धाविनीचा वापर केल्या जातो. मायक्रोसॉफ्ट विंडोज् मध्ये एनटीएफएस ही धाविनी वारतात. लिनक्समधून तुम्ही विंडोज् च्या एनटीएफएसच्या कप्प्यातील विदाशीही निर्धोक खेळू शकता. परंतू, विंडोज् मधून इतर संविधींच्या धाविनीतला विदा वाचणे दुरापस्तच आहे. मग, लिहिण्याचा तर विचारही करावयास नको. अर्थात हे निर्णय त्या-त्या संविधीं विकसित करणा-या चमूंनी घेतलेले असतात आणि त्यास तांत्रिक तसेच व्यावसायिक कारणेही असतात.

लेखाचा समारोप करतांना धाविनीशास्त्रातील अभ्यासकांसाठी उपयुक्त अशा धाविनीचा दुवा देत आहे. त्याचे नाव आहे एसएसएचफ्युज! मिश्रसंगीताप्रमाणेच या धाविनीत वेगवेगळ्या कल्पनांची सुंदर सरमिसळ करून भव्य प्रकल्पांवर काम करणा-या (गर्भाज्ञयानाशी संबंध नसलेल्या) आज्ञाकारांची मोठीच सोय करून दिलेली आहे. त्याबद्दल पुन्हा कधी तरी बोलूच असे ठरवू या आणि हे धाविनीपुराणाचा हा अध्याय इथेच संपवू या.

इंग्रजी दुवा -
१. http://fuse.sourceforge.net/sshfs.html

मराठी-इंग्रजी पारिभाषिक संज्ञा (पु.- पुल्लिंगी, स्त्री. – स्रीलिंगी, न. – नपुसकलिंगी) -
धाविनी (पु.) = file system (fs)
संविधी (पु.) = operating system (OS)
आज्ञायन (न.) = programming
गर्भाज्ञायन (न.) = kernerl programming
भोक्ता / वापरकरी (पु.) = user
गर्भ (पु.) = kernel
समूर्तक (न.) = hardware
संचेतक (न.) = software
विदा (पु.) = data
विदिवा (स्त्री.) = flash drive
विदाधी (स्त्री.) = storage device
विदाक्ष (विदा वाचणारे अक्ष, अर्थात डोळे) (न.) = the head on the disk that reads the data encoded in the form of magnetic tracks
वापरिका (स्त्री.) = application

विदा शब्दाच्या विभक्ती -
विदा हा अनेकवचनी शब्द आहे. विदाचे एकवचन विदांश असे होते. व्यवहारात विदाच्या एकवचनाचा वापर हा तुलनेने फारच दुर्मिळ होतो याचा विचार करून त्याची रूपे अशी भिन्न ठेवलेली आहेत व अनेकवचनी रूप अधिक सुलभ केले आहे. अनेकवचनी रूपाच्या विभक्तींसाठी खालील तक्त्यात सानुनासिक रूपे दिली असलीत तरी, प्रथमाखेरीज इतर विभक्तींना अनुस्वाराशिवाय वापरल्यास तो व्याकरणदोष मानू नये असे माझे मत आहे.

विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा विदांश विदा
द्वितिया विदांशास, विदांशाला विदांस, विदांला, विदांना
तृतिया विदांशाने, विदांशाशी विदांनी, विदांशी
चतुर्थी विदांशास, विदांशाला विदांस, विदांना
पंचमी विदांशाहून विदांहून
षष्ठी विदांशाचा विदांचा, विदांची, विदांचे
सप्तमी विदांशात विदांत
संबोधन विदांशा विदांनो

(शैलेश श. खांडेकर)

3 प्रतिसाद to this post.

  1. खूपच छान वा चांगले काम करत आहात.

    खूप खूप शुभेच्छा !!!

  2. गुण्व्य शब्द अधिक चांगला वाटतो…
    kernel कणीसाशी संबंधित शब्द आहे…

  3. faar mahan kaarya ahe he!

    mala tar vatate kahi lokannin ekatra yevun medical field madhali pan pustake (e.g. Gynaecology) marathit bhashantar karun dnyanachi dalane khuli karavit!

Comments are closed.