गुणळ -> नवीन मराठी शब्द

प्रॉडक्ट या इंग्रजी शब्दाला मराठीत काय संबोधायचे? त्यासाठी शब्दशः भाषांतरातून आलेला उत्पादन हा शब्द प्रचलित आहे. परंतू, उत्पादन या शब्दाच्या अवाक्यात केवळ उत्पन्न झालेले ही अर्थछटाच येते आणि पूर्ण अर्थ न आल्याने तो शब्द तितका सार्थ वाटत नाही. इंग्रजीत प्रॉडक्ट या शब्दाचा दुसरा अर्थ गुणाकार असा होतो. त्यावर विचार

करता गुणस्य, गुणैक्य, गुणेज्य असे समानार्थी शब्द निर्माण करता येतात. त्यापैकी गुणैक्य हा शब्द अधिक चपखल वाटतो. मात्र, तो बोलीभाषेत वापरण्यास अंमळ अवघड वाटतो. त्या दृष्टीने अधिक साधा आणि रूळावयास सोपा असा शब्द काय होईल बरे याचा विचार केला. त्यासाठी गुण हा शब्द घेऊन त्यास एखादा अकारान्ती शब्द जोडता

येईल का याचा प्रयत्न केला. तेव्हा, गुणत, गुणस, गुणय असे शब्द सुचले. गुण्य आणि गुणक हे शब्द तेथे वापरता येत नाही कारण त्यांना गणितात विशिष्ट अर्थ आहे.

त्यावर विचार करतांना अचानक ‘ळ’ हे अक्षर अंती जोडण्याची प्रेरणा झाली आणि गुणळ हा शब्द प्रगटला. त्यावर चिंतन केल्यावर एक गोष्ट जाणवते. गुणळ हा अस्सल काळ्या मातीतला शब्द आहे. तो सुसंस्कृत आहे, उच्चारास सोपा आहे आणि तो शब्द ऐकल्यावर कोणताही पूर्वग्रह मनात येत नाही. “आरं, त्याईचं गुणळ लई झ्याक हाय” असा

ग्रामीण बोलीतील वापर असो किंवा “निढळाच्या घामातून कमावलेली पै अन पै साठवून त्यांनी प्रभाळी स्थापन केली आणि क्षेपणास्त्राशी संबंधित एका अत्युत्कृष्ट गुणळाची निर्मिती केली” असा नागरी लेखीतील प्रयोग असो, गुणळ हा शब्द दोन्हीकडे सारख्याच आत्मियतेने रमतो, :) सारांश, गुणांचा गुणाकार असलेला तो गुणळ असेही आपण म्हणू

शकतो.

व्याकरणदृष्ट्या विचार करता गुणळ हा पुल्लिंगी शब्द आहे, कारण त्याचा शीर्ष शब्दसमूह गुण हा पुल्लिंगी आहे. गुणळाच्या विभक्ती कमळ या शब्दासारख्याच चालवाव्यात. गुणळचे अनेकवचन गुणळे असे करावे.

(शैलेश श. खांडेकर)

7 Responses to this post.

  1. गुण्व्य हा शब्द अधिक चांगला वाटतो…

  2. मस्तच शब्द काढला आहे, मला गुणट असा पण एक आवडला :)

  3. Posted by अश्विनी on जानेवारी 8, 2009 at 3:51 PM

    मला अजिबातच पटला नाही. आपल्या भर्जरी मराठीला अशा ठिगळांची गरजच काय?
    आणि तुम्हाला अभिप्रेत तरी काय आहे? प्रॉडक्ट असा शब्द दो अर्थी वापरला जातो. १. उत्पादन २. गुणाकार. त्यांचा तसा काही संबंध नाही. तुम्ही ती सांगड घालण्याचा प्रयत्न करता आहात. उत्पादन जर फार यांत्रिक आणि रुक्ष शब्द वाटत असेल तर निकालज (रिझल्टंट), बाह्यत्व (आउटपुट) असे काही शब्द विचारात घेता येतील.

  4. साधारणतः नवीन शब्द निर्मिती २ कारणाने होते…
    १. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात
    २. भाषेच्या जिवंतपणाची कल्पना (खात्री) तिच्यामधिल नवीन शब्दांमुळे होते.

    तेव्हा भरजरी भाषेला सोनेरी किनार द्यायला काय हरकत-url(उरली)-असणार?

  5. आपल्या सर्वांच्या अभिप्रायासाठी मनःपूर्वक आभार! गुणट हा सुद्धा मस्त शब्द आहे. मला गुण्व्य शब्दाने मोहीत केले आहे. आता गुणळ म्हणावे की गुण्व्य हा खरोखरीच यक्षप्रश्न आहे, :)

  6. आत्ताच एक कल्पना सुचली आहे. समजा,
    गुणळ = product
    गुण्व्य = prototype of product
    गुणट = product characteristics that differentiates it from other products
    अशी काहीशी शब्दांची योजना केली तर?

  7. चांगली कल्पना आहे…गुण्व्य तर फारच सुंदर आहे

Comments are closed.