निळं पेन

“ए, तू निळ्या शाईचंच पेन का वापरतोस? आता तर संगणकाशी चाळा करता-करता बरंच काही लिहू शकतोस ना!”
“वेग आपल्या अवाक्यातच असायला हवा.”
“उगीच काय? अक्षरांशी करपल्लवी करतांना दोन इशा-यांमध्ये अंतर असू शकते की!”
“ठाऊक नाही. तितकीशी सवय नाही. त्यापेक्षा शाईच्या पेनाचा धोपटमार्गच निर्धोक वाटतो.”
“पण, निळंच का?”
“आधी काळी शाई वापरायचो. मग कळलं की कुणी गेलं की त्याबद्दलचं पत्र काळ्या शाईत लिहायची पद्धत असते.”
“त्याने कुठले अंतर पडतेय? तसंही, रचना म्हणजे कागदाच्या शुभ्रतेचा अंतच ना.”
“तुझ्या तोंडी असली वाक्ये शोभत नाहीत?”
“मी सुंदर दिसते म्हणून?”
“तू सुंदर आहेस म्हणून!”
“:)”
“जितका उत्कृष्ट कलाकार, तितका तो नियम कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतो आणि अपवादात्मक परिस्थितीतच नियमांच्या पलिकडे जातो.पण जेव्हा तो नियमांच्या पलिकडे जातो, तेव्हा ती रचनाही त्यावेळी तितकीच विलोभनीय असते. स्वैराचार टाळणे हीच तर स्वातंत्र्याची किंमत असते.”
“(टाळ्या) अरसिकच आहेस! आकाशात टिपूर चांदणं पडलं आहे.”
“ती शुक्राची चांदणी पाहिलीस का?”
“मी इथे असतांना, दुस-या चांदणीकडे तुझं लक्ष जातंच कसं?”
“तुझ्या सौंदर्याची छायासुद्धा मला सोडवत नाही. ती त्यांच्यावर पडलेली असते तेच निरखित असतो.”
“आ हा हा हा!”
“जांभळी शाईसुद्धा बरेच दिवस वापरयाचो. मग एक दिवस गडद निळ्या शाईतील एक कविता जांभळ्या शाईतील कवितेशेजारी बसलेली पाहीली. तेव्हापासून गडद निळ्या शाईच्या प्रेमात पडलो ते आजतागायत सुटायची इच्छा झाली नाही.”
“मला कधी-कधी तुझं काय करावं ते कळतंच नाही.”
“तेच ठीक आहे. माझंही तसंच होतं. पण, म्हणून आजवर कधी कुठे काही अडलं का?”
“सुखं ओरबाडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा हे कधीही चांगलं”
“म्हणूनच म्हणतो की कुठल्या शाईचं पेन वापरतो यापेक्षा शाईचा ओलावा शब्दात उतरतो हे अधिक महत्त्वाचं”

यानंतरही त्यांच बराच वेळ बोलणं झालं, पण आता ते इथं सांगणं योग्य नाही.

(शैलेश श. खांडेकर)