नुकतीच एका स्नेहींनी मराठीतील दुभाषा (कंपायलर) बनवण्याच्या प्रयत्नांचे काय झाले याबद्दल कुतूहल व्यक्त केले. त्यासाठी ही टिपा!
मराठीत दुभाषा बनवण्याचा प्रयत्न मी वैयक्तिक पातळीवर करत आहे. त्यातले युद्ध सात आघाड्यांवर सुरू आहे.
१. नवीन आज्ञाभाषा (प्रोग्रॅमिंग लँग्वेज) बनवणे. तल्लख आज्ञाकारांना त्यात रूची येण्यासाठी, ती इंग्रजीत उपलब्ध असलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या भाषांपेक्षा अधिक सक्षम असायला हवी. सगळ्यांपर्यंत ती पोहोंचण्यासाठी ते आवश्यक आहे.
२. आज्ञाभाषा शिकायला सोपी आणि तज्ञांसाठी सक्षम ही परस्पर विरोधी उद्दिष्टे आहेत. त्यांचा सुयोग्य मेळ एखाद्या सुंदर कवितेसारखा झाला पाहिजे.
३. आज्ञाभाषेची नाळ मराठीस जोडलेली असावी. केवळ सी++ किंवा तत्सम आज्ञाभाषेचे व्याकरण ठेवून मराठीत केवळ प्रतिशब्द योजून आज्ञाभाषा रचण्यात फारसा अर्थ नाही.
४. आज्ञाभाषेचे व्याकरण नक्की झाले की मग त्याचा दुभाषा बनवायला लागेल.
५. त्यानंतर त्यात अनेक आज्ञालये लिहावी लागतील. जेणेकरून, ती भाषा वापरणा-यास मूलभूत गोष्टींसाठी शोध लावावे लागणार नाहीत.
६. आज्ञाभाषा कशी वापरावी यासंबंधी लेख, दस्तऐवज लिहीतांना संगणकीय संज्ञांसाठी नवीन मराठी शब्द बनवणे हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा भाग आहे.
७. नवीन आज्ञाभाषेत संचेतकांची (सॉफ्टवेयरांची) निर्मिती करावी लागेल. त्याने ही आज्ञाभाष परिणामकारक पद्धतीने कशी वापरता येईल हे आज्ञाभाषा वापरू इच्छिणा-यांना सोयीचे होईल.
सध्या पहिल्या चार आघाड्यांवर यावर एकत्रित लढाया सुरू आहेत. अमूक एक व्याकरण नक्की केल्यावर जेव्हा आपण त्यात निरनिराळ्या आज्ञावली लिहीतो तेव्हा व्याकरणात काय सुधारणा आवश्यक आहेत याची अंधुक कल्पना येते. त्यामुळे या आघाड्यांवर एखाद्या चक्रासारखे काम करावे लागते.
या आघाड्या जिंकल्यावरच त्याबद्दल अधिक माहिती प्रकाशित करू शकेल. संतांनी म्हटल्याप्रमाणे “अभ्यासोनी प्रकटावे” या उक्तीनुसार पावले टाकत आहे. त्यामुळे जरी वेळापत्रकाप्रमाणे काम सुरू असले तरी ते वेळापत्रक जाहीर करत नाही कारण अनपेक्षित तांत्रिक अडचणींचे पर्वत, कधी कामाच्या वेगांस गोगलगाईपेक्षाही कमी करतात, तरी कधी गरूडापेक्षाही वेगात नेतांना वेगळ्याच दिशेला नेतात. एकदा का आज्ञाभाषेचे डझनाहून अधिक वापरकर्ते झाले की मग प्रत्येक बदल करतांना खूप काळजी घ्यावी लागते आणि एकूण गती अतिशय कमी होते. त्यामुळे शक्य तितका निर्धोक मार्ग पत्करला आहे.
यातून कुणास प्रेरणा मिळून त्यांनी अशा प्रकारचा उपक्रम आधीच केल्यास मला आनंदच होईल. विशेषतः मायक्रोसॉफ्ट किंवा गुगलने काही गुणस्य बनविल्यास बहार येईल. त्या दोघांनीही बनवले तर दुग्धशर्करा योगच!
स्नेहांकित,
शैलेश श. खांडेकर
तांत्रिक संज्ञा -
दुभाषा – compiler
आज्ञाभाषा – programming language
आज्ञालय – library
संचेतक – software